Thursday, 11 December 2014

पान ५

एक जीवत्व नाही तोवर...
******************************
डाव्या हाताचे उजव्या हाताशी काय बरे नाते?
एकच जीव दोघांत वावरतोय्... ... एकजीवत्व तिथे
मग कसले आले नाते?
'नात्या' चा जन्म जीव-विभागणी नंतर
सजीवा चे तुकडे करुन तया निर्जीव केल्या नंतर......

जिथे जिथे विभागणी तिथे तिथे हे असेच
दोन निर्जीवां ना प्रेमाने जोडा का जोमा ने जोडा
मीलन वरवर चेच...

'एकजीवत्वाला'  कुठलाच पर्याय नाही म्हणुनच
 जगात हा एक विषय ....फक्त चर्चेचा..
सर्व कांही कामचलाऊ...हे असेच चालत राहणार....
तंटे, झगडे,हिंसा, युद्ध..... सलोखे, समझौते आणि युद्ध विराम
निर्जीव झालेल्या माणसांच्या तुकड्यांत, टोळ्यांत...
..हे असेच चालत राहणार....
अरुण
कथा कथा अनेक कथा
***********************
कथा कथा अनेक कथा...माझी तुझी त्याची कथा
प्रत्येका ची प्रत्येक वेळी...वेगळीच कथा
जग हे कथांचाच अंतरसंवाद
कथेंनीच केलेली कथेंची उजळणी
कथेंना पडणा-या स्वप्नांची कहाणी
कथा अनेक असल्या तरी संवेदना त्याच आहेत
धागे वेगळे असले तरी गुंता तोच आहे
तेच हसू, तेच रडू, तोच तणाव, तोच संघर्ष
तोच जिव्हाळा,तोच दुरावा
भाषा वेगळी, पात्र वेगळे, कारणें अनंत
तरी तीच आशा, तीच खंत
कथांना अनेक दालने, दिशा ही अनेक
पण गाभा एकच
वर्तुळे अनेक पण केंद्र एकच
ज्यांना हे केंद्र उलगडले
त्यांचे जगच उजळले
- अरुण

बाजारू स्त्री ची व्यथा..चीड...आकस
***********************************

चुकले पाऊल रस्त्यावरती, जबर लागली ठेच रे
जीव सांडला भर बाजारी, दौलत फेकुन वेच रे
*******
प्रीत खाजगी चिरडुन गेली इश्काच्या गर्दी खाली
घुंघरू चे हे नाद..हरवली प्रणय सुरांची नवलाई
प्रत्येकाशी लगट सारखे.. प्रत्येकी मन तेच रे
*********
रुक्ष अधाशी नजरा भियवीत, केविलवाणी नार रसाळ
फिरता हा मदनाचा भवरा, मर्द जाहला किती मवाळ ?
कोण कुणावर वरचढ येथे ? हाच अनोखा पेच रे
********
घर करण्याचे स्वप्न पाहिले, बेघर झाले फसली वाट
दिवस रात हे बाजाराचे, झाले सर्वांची वहिवाट
खोटे रमणे जगा रमविणे अता नशिबी हेच रे
***********
 
दूर देवळे बंधित बसले.. ह्या कोठयांचे रचनाकार
परमेशाच्या माथ्यावरती ठेवित ह्या पापाचा भार
तुझ्याच घराच्या तुळशीची ही पाने समजुन वेच रे
**********
चुकले पाऊल रस्त्यावरती, जबर लागली ठेच रे
जीव सांडला भर बाजारी,दौलत फेकुन वेच रे


धावत्या नदी सवेच धावतो किनारा
श्वांस घाट करी प्रवास, जीवन क्षणधारा

वा-यावर पान उडे, पानावर जीव उभा
धरपडतो तू जपण्या क्षणभंगुर प्राण उगा
ही 'त्याची' फुंकर रे, हा 'त्याचा' वारा
धावत्या नदी सवेच धावतो किनारा

रेघोट्या काढोनी धरणी चे भाग करी
एक तुला प्राणप्रीय, दुसरा परदेश परी
हा 'त्याच्या' सृष्टीचा पसरला पसारा
धावत्या नदी सवेच धावतो किनारा

जीवन हे गंध देत फुलणा-या सुमनांचे
प्रेम करीत सर्वांवर, जगणा-या सुजनांचे
'तो' करुणा सागर, 'तो' प्रेमभाव सारा
धावत्या नदी सवेच धावतो किनारा

गेलेले सरले अन् येणारा एक भास
असणारा दिवस खरा, जिथे खराखुरा वास
असणारा क्षण जिवंत.. ईशचा निवारा
धावत्या नदी सवेच धावतो किनारा

धावत्या नदी सवेच धावतो किनारा
श्वांस घाट करी प्रवास, जीवन क्षणधारा
अरुण


प्रेम
*******
प्रेमा ला प्रेमभंगाची काळजी नाही,
प्रेम कशाबद्दलही possessive नाही
कारण, प्रेम पूर्णतः निरपेक्ष असते
कारण, ते फुलातुन पसरणा-या सुगंधा सारखे, सर्वांसाठी असते,
प्रेम जन्मते अखंड पूर्णत्वाच्या ठायी
मग 'मी'पण   किंवा अहंकार ज्याचे अस्तित्त्वच खंडत्वातुन साकार होते,
प्रेमाची भाषा कशी काय बोलू शकणार ?
त्याचे प्रेम 'निर्मळ' मानले जात असले तरी त्या प्रेमाला
अपेक्षेंचा दर्प हा असतोच.......

अपेक्षा हा अहंकाराचा आत्माच आणि या उलट
निरपेक्ष भाव हा पूर्णत्वाचा स्वभाव
तरी ह्या देव-घेवाच्या व्यवहारी जगात
तथाकथित प्रेमाचे उद्दात कौतुक कां बरे होत असते?
प्रेमावर  अगणित कहाण्या रचल्या गेल्या
कितीक कविता लिहून झाल्या, याचा हिसाबच नाही

प्रेम.... प्रेमा सारखे करता आले नाही,
पण प्रेमा सारखे सही सही भासवता आले तरी
ते Great ठरते
अपेक्षांनी गंुफलेल्या ह्या नात्यां च्या जगात,
माझे-तुझे करणा-या ह्या मानवी मनांत,
प्रेम शब्दाला एवढी प्रतिष्ठा कां?
- अरुण

"प्रयत्न सतत चालू असावे, श्रमा विना कांहीच साध्य होणार नाही"
हे पाठ ऐकतच माणुस लहानाचा मोठा होतो
'जे आहे आणि जे असायला हवे', ह्या दोन परस्पर विरोधी
गोष्टीं मधील संघर्ष घडवण्यातच
साध्यवेड्या प्रयत्नशील माणसाची ऊर्जा वाया जात असते



सहजिका
***********
थेंब क्षणांचे बरसत राहतात
बरसत बरसत गोठुन जातात, काळाचे ओझे बनुन
पण एक ही क्षण न बरसला असा की ज्यात
सारे जीवनच सामावुन जावे, काळाला संपवुन
- अरुण

No comments:

Post a Comment