१ फरवरी
बोधस्पर्शिका
************
प्रकाश पसरतो सर्वत्र सारखाच
न्याय ईश्वराचा सर्वांस सारखाच
उघडी असतील कवाडे तरच दिसते
परम साक्षात्कार सर्वांस सारखाच
अरुण
बोधस्पर्शिका
************
अंधार हे नाव.. अंधत्वाचे
उजेड......म्हणजेच दृष्टी
दिव्यत्व.... किंवा देवपण
सतत तिथे कारुण्य वृष्टी
अरुण
बोधस्पर्शिका
************
चिर निद्रा........मृतावस्था
गाढ़ झोप ........ शांतता
स्वप्न झोप.... शांत-श्रम
जागेपण.........श्रमावस्था
समाधी.....विश्रांत अवस्था
अरुण
बोधस्पर्शिका
************
जन्मताच माणसाला
वळण लावणे सुरू होते आणि मग
वळण पावलेल्याला माणसाला
सरळ काय... ते कळत नाही
- अरुण
बोधस्पर्शिका
************
'मी आणि माझे' -
एक स्वतंत्र अस्तित्व आहे,
असे वाटत आहे प्रत्येकाला, ह्या जनसागरात,
पण महासागरातली प्रत्येक लाट,
सागराशी असणारे तिचे एकत्व,
न विसरता तरंगत अाहे
अरुण
बोधस्पर्शिका
*************
एखादे बीज रुजले की
त्याचे झाड होण्यास वेळ लागतो...
परंतु स्वत:चे वेडेपण स्पष्ट उमजताच
माणूस शहाणा होतो
वेळ-काळ भौतिक घटने साठी लागतो
मानसिक जागृती साठी नाही
अरुण
बोधस्पर्शिका
**************
आरसा खरा असला
तरी प्रतिबिंब खरं नसतं
खऱ्याच्या खांद्यावर बसुनच
खोटं चालत असतं
-अरुण
बोधस्पर्शिका
**************
मुक्ती ला बंधनाचे भय नाही,
बंधनाला मुक्ती हवी हवी वाटते पण
मुक्ती काय.. हे उमगत नाही,
आणि म्हणुनच
मुक्ती... सतत विद्यमान असुनही
बंधनांना त्याची जाणीव नाही
-अरुण
बोधस्पर्शिका
************
एका आचमनातच जर
अख्खा सागर कळुन येत असेल तर
सागरात शोध प्रवास कशासाठी?.....
ध्यान म्हणजे आचमन
ज्ञान म्हणजे शोध प्रवास
अरुण
रुबाई
*******
पादरी मौला-ओ-पंडित की रुचि रब में कहाँ?
राह-बेचूँ हैं सभी.. मंजिल से मतलब है कहाँ ?
यूँ यहाँ, थाली कटोरी और प्यालों की दुकानें
भूख का कोई पता ना... प्यास भी लब पे कहाँ?
-अरुण
वरील रुबाई चा आशय मराठीत
*****************************
ह्या अज्ञानी दुनिये ची लीलाच निराळी, जायचे कुठे हे ठरले नसतां ही वेगवेगळे मार्ग दाखवणारे (पादरी,मौला,पंडित ) अनेक आहेत. असे वाटते की इथे...भूक व तहान, अशा अनुभूतींचा पत्ता नसतां ही....ताट वाटी भांडी विकणारी दुकाने चालतायेत.
अरुण
बोधस्पर्शिका
*************
ज्याप्रमाणे रामायण
नुसती राम कथा नसून, राम-रावण कथा आहे
तसेच स्वत:ची कोणताही घटना किंवा अनुभव
आठवला की त्या आठवणीत स्वत: चे अस्तित्व
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सामावलेलेच असते
अरुण
बोधस्पर्शिका
**************
अर्जुना चा अज्ञानजन्य विषाद,
त्याची गोड फसगत करीत होता.
अंधारालाच प्रकाशाचे महत्व देत
युक्तिवाद करणाऱ्या अर्जुनाचा प्रत्येक मुद्दा,
कृष्ण सहजतेने उपटून टाकीत होता.
अर्जुनाच्या पांडित्याला डोळे नव्हते तर...
कृष्णाच्या शहाणपणा च्या गोष्टींत कुठलाही
देखावा किंवा डावपेच नव्हता
अरुण
बोधस्पर्शिका
***************
जीवनात येणारी कोडी
तर्क सोडवतो हे खरे,
परंतु जीवनाचे कोडे मात्र
त्याला उमजत नाही
अरुण
बोधस्पर्शिका
***************
शब्दांवर तरंगणारा
पैलतिरी जातो
शब्दांना गिळणारा,
गिळताच बुडून जातो
-अरुण
बोधस्पर्शिका
***************
जन्मावेळी मन नसत
नंतर समाजाशी होणाऱ्या
संवाद-संपर्कातुन
ते जन्माला येत
-अरुण
बोधस्पर्शिका
*************
काठावर बसुन जपजाप केल्याने
प्रवाह पाण्याचा कळत नाही
जो नदीत उतरला.. तो
जपजाप करत बसत नाही
अरुण
बोधस्पर्शिका
************
अनुभवाला गाळून
प्यायचं नसतं
माहीतीला तपासून
घ्यायचं असतं
अरुण
बोधस्पर्शिका
************************
अंतर असेल मधे .... तर चालणे आले...
अंतर नाहीच तर मग चालायचे कशाला ? श्रम करणे कशाला ?
अंतर संपवण्यासाठी फक्त जाग यायला हवी.
सत्य तर आहे नेहमीच... जे जागले त्यांना दिसले, ....
जे जागले नाहीत
ते मार्ग शोधण्याचा प्रपंच करत बसले
अरुण
बोधस्पर्शिका
**************
जुने बदलून जे बनते ते नवीन नसते
जुने विसरल्यावर जे कळते
तेच असते नवीन
-अरुण
बोधस्पर्शिका
*************
आध्यात्मिक प्रचिती साठी ज्ञानी किंवा पंडित होणे ....काहीही कामाचे नाही. ज़रूरी तेवढेच कळणे पुरेसे आहे. शहाण्याला जरूरी काय हे नीट उमजत असल्या कारणाने तो आवश्यक तेवढेच ज्ञान वापरत तरून जातो. मूर्ख... ज्ञाना अभावी बुडतो .....तर अतिज्ञानी ज्ञानाला लोमकळत राहतो
- अरुण
मराठी ग़झल
**************
हे फुलांचे गाव.. तरी येती विराणे
जीवितांनी बांधली अपली स्मशाने
***
मोसमी वारे क्षणाचे....... दूर सारा
भले, माझे कोरड्या श्वांसात जीणे
***
वार कैसेही असो.... पचवीन आता
राहिली नाही कुठे . नाजुक ठिकाणे
***
रसिकता उसनी मिळाली या जगाला
बेसुरांचे चालले आता......... घराणे
***
काल मी सूर्यास म्हणलो... पुरे झाले
पण पहाटे..परत सुचले... मज बहाणे
***
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
जिथे आपण सुरु करतो... तो आपला आरंभ
जिथे थांबतो................... तो आपला अंत
पण अस्तित्वात नसे........... प्रारंभ अाणि अंत
- अरुण
बोधस्पर्शिका
*************
ज्ञान नेहमीच अपूर्ण असते
अंतरदृष्टी तर.... नेहमीच पूर्ण असते
अरुण
बोधस्पर्शिका
*************
आई देते जन्म
आणि समाज देतो वेगळेपण,
ह्या वेगळेपणातुन जन्मलेले ‘माझे-तुझे’-
टिकून राहते आमरण
-अरुण
बोधस्पर्शिका
***************
ह्या अस्तित्वात, ह्या जीवनात, कांहीही स्थिर व थांबलेले नाही.
ठोस असे... वस्तुरूप, व्यक्तीरूप व स्थानरूपात ही, इथे कांही नाही.
इथे केवळ संचार आहे, प्रकियण ( Process) किंवा अंतर्बाह्य परिवर्तनाचा प्रवाह चालू आहे.
त्याच नदीत परत उतरावे... पण जिथे उतरावे तिथले पाणी तेच नसते आणि त्यात उतरणारा ही तोच नसतो.
सर्व काही बदलत आहे...
कण कण आणि क्षण क्षण ही.
------------------------------------------
एक रुबाई
**********
ठहराव नही है...... है बहाव जिंदगी
न रुका कुछ भी.... न पड़ाव जिंदगी
है न चीज़, शख़्स..... न जगह कोई
'है' का ना वजूद, बदलाव ही जिंदगी
- अरुण
No comments:
Post a Comment